खेड : खवटीजवळील अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडी परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात काटवली (ता. सातारा) येथील सुरज ज्ञानेश्वर तरडे (वय २६) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी खवटी येथील रिक्षाचालक गणेश गोपाळ दळवी याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास सुरज तरडे व त्यांचा भाऊ शुभम ज्ञानेश्वर तरडे (वय २३) हे दोघे मोटारसायकल (क्र. एम.एच. १२ पी.पी. ९९१०) वरून जात होते. ते दोघे काटवलीहून खवटीकडे प्रवास करत असताना, खवटीजवळ समोरून येणाऱ्या रिक्षा (क्र. एम.एच. ०८ व्ही. ०५१४) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात सुरज तरडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.या घटनेनंतर मृताचा भाऊ शुभम तरडे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रिक्षाचालक गणेश दळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, काटवली गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील बेफाम वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *