दापोली : हळदीच्या कार्यक्रमात अचानक चक्कर येऊन ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

दापोली तालुक्यातील पालगड सुतारवाडी येथे एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दुर्दैवी घटना घडली असून ६५ वर्षीय व्यक्तीला अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, अनंत सिताराम पांचाळ (वय ६५ वर्षे, रा. पालगड गुजरवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हे दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता पालगड सुतारवाडी येथे कल्पेश दिपक देवघरकर यांच्या लग्नाच्या हळदी समारंभासाठी गेले होते.


कार्यक्रम सुरू असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. काही क्षणांतच ते बेशुद्ध झाले. उपस्थितांनी तात्काळ त्यांना पालगड येथील स्थानिक डॉक्टर किशोर फडके यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आले. मात्र तेथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

ही घटना २५/०४/२०२६ रोजी रात्री सुमारे ०२.०२ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे पालगड आणि सुतारवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *