मंडणगड तालुक्यातील राजेवाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे मंडणगड तालुक्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, मंगळवारी (दि. २ जून) पहाटे शेनाळे गावाजवळ घडलेल्या अपघाताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई सेंट्रल येथून रात्री १२ वाजता सुटलेली मुंबई आगाराची नियमित एसटी बस सडे मार्गे मंडणगडकडे येत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास बस शेनाळे गावाच्या हद्दीत पोहोचली असता अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला दरीच्या दिशेने कलंडली. बसमध्ये त्यावेळी १८ प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, सुदैवाने बस पूर्णपणे दरीत कोसळली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळताच शेनाळे गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्वनाथ सावंत, तसेच सुनील साळवी, विकी कदम, विवेक वाडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले, त्यांची विचारपूस केली आणि पुढील प्रवासासाठी रिक्षांची व्यवस्था करून दिली. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
स्थानिकांच्या मते, महामार्गाच्या कामासाठी ठिकठिकाणी खडी, रेती आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यालगत टाकण्यात आले आहे. या साहित्याचा मोठा भाग आता रस्त्यावर पसरला असून त्यामुळे वाहनांचे टायर घसरत आहेत. विशेषतः रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्या कमी प्रकाशात वाहनचालकांना रस्त्यावरील या धोकादायक परिस्थितीचा अंदाज येत नाही. याच कारणामुळे चालकाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवेकडे जाणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कामांमध्ये वारंवार विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अपूर्ण रस्ते, उघडे खड्डे, रस्त्यावर पडून राहिलेले बांधकाम साहित्य आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यावर पसरलेली खडी आणि रेती तात्काळ हटवावी, महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













