गणेशोत्सवाच्या तोंडावरच चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुलावरील रस्ता खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरती स्वीटसमोरील पुलावर रस्त्याचा काही भाग खचून मोठी पोकळी निर्माण झाल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

पुलावरील रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. विशेषतः अवजड वाहने आणि दुचाकीस्वारांसाठी हा भाग अधिक जोखमीचा ठरत आहे. स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांनी या धोकादायक परिस्थितीबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काँक्रिटचा पूर्ण पॅच टाकून नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ताही खचल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थिती अधिक बिघडल्यास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
दोन वाहनांचे टायर फुटले; मोठा अनर्थ टळला
या धोकादायक ठिकाणी रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. काल रात्री या खचलेल्या भागावरून जाताना दोन वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये मोठा अपघात किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे पुलावरील रस्त्याची धोकादायक अवस्था पुन्हा अधोरेखित झाली आहे.
रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खचलेला भाग वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांनाही या ठिकाणी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पोलिसांकडून बॅरिकेड्स
धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी या परिसरात बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना धोक्याचा इशारा दिला आहे. मात्र, बॅरिकेड्स लावणे हा केवळ तात्पुरता उपाय असून, संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा वेळी पुलावरील रस्ता खचलेला असणे गंभीर ठरू शकते.
‘ब्रिटिशकालीन पुलाची पूर्ण पाहणी करा’
सदर महामार्ग ब्रिटिशकालीन पुलावरूनच बांधण्यात आल्याने या पुलाची संरचनात्मक स्थिती तपासण्याची मागणीही होत आहे. पुलावर पाणी साचून वारंवार रस्ता खराब होणे, खड्डे पडणे आणि अपघात होणे, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

“ब्रिटिशकालीन पुलाची खालूनही पूर्ण पाहणी करून त्याची संरचनात्मक सुरक्षितता तपासावी आणि त्यानंतरच महामार्गाची आवश्यक कामे करावीत. अन्यथा प्रशासनाला मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य तथा समाजसेवक देवराज गरगटे यांनी दिला आहे.
गणेशोत्सवापूर्वी या ठिकाणची परिस्थिती सुधारून वाहतूक सुरक्षित करावी, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून खचलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













