खेड,दापोली, मंडणगड येथील तीनही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये महत्त्वाची पदे रिक्त

banner 468x60

खेड : दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदार संघामध्ये आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवरती असलेली पाहायला मिळत आहे.

खेड, दापोली आणि मंडणगड येथील तीनही उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून

ग्रामीण भागातील रुग्णांना कोणतीही अत्यावश्यक सेवा या शासकीय रुग्णालयांमधून मिळत नसल्याने खाजगी रुग्णालयातून त्यांना विविध चाचण्या व उपचार घेण्याची दुर्दैवी वेळ येत आहे.

यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे पाहायला मिळते.दापोली, खेड विधानसभा मतदार संघात अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच परिचारिकांमुळे तीनही तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालये व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंडणगड तालुक्याचा विचार करता शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक पदासह तीन पदे रिक्त आहेत. सहाय्यक अधिक्षक पद देखील रिक्त आहेत तसेच काही प्रमाणात अधिपचारिकांची पदे देखील रिक्त आहे. या रुग्णालयात एकूण २६ मंजूर पदांपैकी महत्त्वाची ७ पदे रिक्त असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये ५० खाटांचे हे रुग्णालय असताना सोनोग्राफी तसेच एक्सरे मशीनचे तंत्रज्ञ नाहीत तसेच भूलतज्ज्ञ यांचा पदभार देखील तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक बालाजी सगरे हे रुग्णालयामध्ये कधीच उपलब्ध नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी असतात. डॉ. सगरे यांच्याकडे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार आहे. मात्र, तिथे देखिल हजर नसल्याच्या तक्रारी रुग्णांमधून वाढत आहेत. आता खेड १०० खाटांचे कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था देखील दयनीय आहे. या रुग्णालयात कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिक्षक हे आठवड्यातून फक्त दोन दिवस येत असल्याच्या तक्रारी असून एकूण ९३ मजूर पदांपैकी ५६ पदे रिक्त आहेत. या रुग्णालयात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिक्षक वगळता कोणीही एमबीबीएस डॉक्टर नसल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी जिह्यातल्या खेड तालुक्यातील (२) प्राथमिक आरोग्यकेंद्राची परिस्थिती आजारी पडल्यासारखी आहे. दिवसाला १०० हून अधिक ओपीडी असताना खेड तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही एएबीएस डॉक्टर नियुक्तीवर नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर बीएमएस आणि बीएएमस वैद्यकीय अधिकारी यांच्या हाती कारभार असल्याचे पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात ग्रामीण भागात ९ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये आंबवली, लोटे, फुरुस, तळे, वावे, तिसंगी, कोरेगाव, जामगे आणि शिव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याठिकाणी १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना एकही एमबीबीएस डॉक्टर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अनेक महिला रुग्णांची तसंच अत्यावश्यक आरोग्य सेवांची वानवा असल्याचे पाहायला मिळते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून होत आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणाऱ्या अनेक तपासणी यंत्रणा बंद असल्याचे देखिल समजते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *