चिपळुण : तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात, गांजा सेवन करणारे चौघे ताब्यात

banner 468x60

शहर आणि परिसरात अमली पदार्थाचे खुलेआमपणे सेवन केले जात आहे. शहरातील विरेश्वर कॉलनी येथील नव्याने काम सुरू असलेल्या एका इमारतीत ४ तरूणांना गांजाचे सेवन करताना पकडले. हे चारही तरूण झिंगलेल्या अवस्थेत होते.

पोलिसांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले. गांजा सेवन केलेल्या तरूणाने शहरातील एका बॉडीबिल्डरचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.

banner 728x90

तर चिपळूण पोलिसांनी अमली पदार्थाचे रॅकेट उद्वस्थ न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी दिला.

शहरात सातत्याने अमली पदार्थाचा पुरवठा आणि त्याचे सेवन करणाऱ्या घटना घडत आहेत. काही महिन्यापुर्वी अमली पदार्थाचे सेवन केलेल्या तरूणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतरही शहरातील विविध भागात तरूणाई अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची चर्चा आहे.

शहरातील विरेश्वर कॉलनी येथे एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. गेली दोन तीन महिने या इमारतीचे बांधकाम बंद आहे. याच इमारतीत काही तरूण येत असल्याची चर्चा होती. त्यानुसार काही लोकांनी बुधवारी सकाळपासूनच पाळत ठेवली होती.

इमारतीच्या बाजूलाच दुचाकी पार्किग करून हे तरूण इमारतीत गेले. तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत टेबल लावून गांजाचे सेवन सुरू केले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या लोकांनी या चारही तरूणांना ताब्यात घेतले. त्यावेळी हे तरूण नशेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनास्थळी पोलिस दाखल होताच त्यांना ताब्यात घेतले. या तरूणांना विचारणा करताना शहरातील एका बॉडीबिल्डर करून गांजा घेत असल्याचे सांगितले. या चार तरूणांपैकी एकजण कापरे येथील असून उर्वरीत तिघेजण शहरातीलच आहेत. कापरे येथील या तरूणास यापुर्वी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात ताब्यात घेतले होते.

यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले माजी आमदार रमेश कदम यांनी सांगितले की, येथील तरूणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. गांजासह अमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढती आहे. पोलिस यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढायला हवीत. गांजासह अमली पदार्थाचे पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी.

येत्या पाच दिवसात या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास पोलिस स्थानकावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाईल, असा इशारा दिला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव संतोष नलावडे, माजी नगरसेवक राजेश कदम, श्रीनाथ खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *