पोफळीतील गावांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात यासंदर्भात पाहणी होणार आहे.

कोयना प्रकल्पाच्या बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या चार गावच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभागाला केली आहे.
कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिनाभरात सुरू होणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरपासून कोयनेच्या टप्पा १, २ ची वीजनिर्मिती बंद केली जाणार आहे. पोफळी येथील ईव्हिटीतून पोफळीसह कोंडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे गावच्या नळपाणी योजनेसाठी पाणी आणण्यात आले आहे.
त्याशिवाय महानिर्मिती कंपनीच्या कर्मचारी वसाहतीला ईव्हिटीतूनच पाणीपुरवठा होतो. गळतीचे काम करताना टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद झाल्यानंतर कोयना धरणातून पोफळी ईव्हीटीकडे येणारे पाणी बंद केले जाणार आहे. त्यामुळे या भागाला पाणी मिळणार नाही.
एक वर्षापूर्वी गळती काढण्याबाबत जलसंपदा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या त्याचवेळी संबंधित ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने पत्र पाठवून पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली होती. आता १९ नोव्हेंबरपासून कोयनेचा टप्पा १ आणि २ बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पर्यायी उपायोजना करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी गावातील ग्रामस्थांची बैठक झाली. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, आमदार शेखर निकम, महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत चार गावातील संभाव्य पाणीटंचाईबद्दल तोडगा काढण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले. चार गावांसाठी नवीन पाईपलाईन टाकून पाणी आणायचे झाले तर त्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे.
दोन महिन्यात गळतीचे काम पूर्ण होईल; पण नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम होणार नाही. त्यामुळे जुन्या योजना चालू करता येणे शक्य आहे का किंवा कोयना प्रकल्पाच्या इतर स्रोतामधून पाणी देणे शक्य आहे का, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तपणे पाहणी करावी, असे बैठकीत ठरले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













