दोडामार्ग : तेरवण मेढे धरणात पिकुळे येथील युवकाची आत्महत्या; मृतदेह आढळला, परिसरात हळहळ

banner 468x60

दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे धरण परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिकुळे व परिसरात शोककळा पसरली आहे. दत्तप्रसाद गवस (रा. पिकुळे) या युवकाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने ही घटना आत्महत्येची असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दत्तप्रसाद गवस हा गुरुवारी संध्याकाळपासून घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. तो बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व स्थानिकांनी परिसरात, तसेच संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.


दरम्यान, शुक्रवारी सकाळी तेरवण मेढे धरण परिसरात त्याची दुचाकी आढळून आल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने धरण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळानंतर पाण्यातून युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून तो दत्तप्रसाद गवस याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दत्तप्रसादने धरणात उडी घेऊन जीवन संपवले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच त्याच्या वैयक्तिक परिस्थितीची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे गवस कुटुंबावर मोठा आघात झाला असून पिकुळे व तेरवण मेढे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *