चिपळूण : एकाकी जेष्ठ नागरिकांसाठी ‘मिशन प्रतिसाद’ ठरत आहे आधारवड – आशिष बल्लाळ,रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या संकल्पनेतून माणुसकीचा उपक्रम

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या संकल्पनेतून गावागावात एकटे, एकाकी जीवन जगणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला ‘मिशन प्रतिसाद’ हा लोकाभिमुख उपक्रम आज अनेक वयोवृद्धांसाठी आधारवड ठरत आहे.

banner 728x90

या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील एकाकी जेष्ठ नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी व तक्रारी हेल्पलाईन क्रमांक 9684708316 व 8390929100 वर नोंदविल्या जातात. संपर्क साधल्यानंतर पोलीस कर्मचारी संबंधित जेष्ठ नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतात व त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची अभिनव परंपराही या उपक्रमातून राबवली जात आहे.

मागील काही दिवसांपासून चिपळूण बीट कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागात अशा जेष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. अनेक जेष्ठ नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस अधिकारी वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी आल्याचे सांगितले. फुलं, शुभेच्छापत्र आणि मायेचा शब्द मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद भावूक करणारा असतो.

थोडा वेळ त्यांच्यासोबत घालविल्यानंतर हे जेष्ठ नागरिक मनमोकळेपणाने संवाद साधू लागतात. कोणी प्रेमाने चहा-बिस्किट देतो, तर कोणी आपल्या परसातील चिणी, करांदे पिशवीत घालून देण्याचा आग्रह धरतो. या भेटींमधून जेष्ठ नागरिकांच्या मनातील एकटेपणाचा भार काही काळ हलका होत असल्याचे दिसून येते.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जेष्ठ नागरिकांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये स्थायिक आहेत. मात्र काही जेष्ठ नागरिकांना मातीच्या घरात राहण्याची सवय असल्याने शहरात राहवत नाही, तर काहींना चार भिंतीत कोंडल्यासारखे वाटते. काही जण जीवनसाथीच्या निधनानंतर एकाकी जीवन जगत आहेत. शेजाऱ्यांचा आधार लाभणारेही आहेत, तर काही जेष्ठ नागरिक पूर्णपणे एकटे आहेत.

आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या जगाशी अनेक जेष्ठ नागरिकांचा फारसा संबंध नाही. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुलं व नातवंडे समोर दिसल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. काही जेष्ठ नागरिक आपल्या भावना आवरू शकत नाहीत. या संवादातून कोकणी मराठीच्या विविध बोली ऐकायला मिळतात, तर निघताना अनेक जेष्ठ नागरिक मायेने गालावरून हात फिरवतात किंवा मुका देऊन निरोप देतात.

नितिन बगाटे यांनी सुरू केलेल्या ‘मिशन प्रतिसाद’ या उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमधील नाते अधिक दृढ होत असून, एकाकी जेष्ठ नागरिकांच्या जीवनात संवाद, विश्वास आणि आपुलकीचे नवे पर्व सुरू झाले आहे. समाजात माणुसकी जपणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

साभार : आशिष प्रकाश बल्लाळ यांच्या फेकबुक पोस्टवरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *