महाड-दापोली मार्गावर एसटी बसचा अपघात, कुटले गावाजवळ बस घसरली, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

banner 468x60

महाड-दापोली राज्य मार्गावरील निकृष्ट रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली असून, गुरुवारी (१६ जुलै) दुपारी मुंबई सेंट्रल आगाराची फौजी अंबवडे–मुंबई एसटी बस कुटले गावाजवळ रस्त्यावरून घसरून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात चालक, वाहक आणि सर्व प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल आगाराची ही एसटी बस दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास महाडच्या दिशेने येत होती. कुटले गावाजवळ पोहोचताच चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या साईडपट्टीवरून घसरत रस्त्याच्या कडेला गेली. बसचा वेग तुलनेने कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक, वाहक आणि पाच प्रवासी असे एकूण सात जण होते. बस घसरल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा अनर्थ टळल्याचा सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या अपघातामुळे महाड-दापोली राज्य मार्गाच्या दर्जाबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षीही पावसाळा सुरू होताच शिटगाव ते आंग्रे कोड या परिसरात अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली होती. त्या वेळीही रस्त्याच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्यावरील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असून पावसाचे पाणी साचल्याने रस्ता अत्यंत निसरडा बनतो. विशेषतः वळणाच्या ठिकाणी वाहनांवरील नियंत्रण सुटण्याचा धोका अधिक असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एसटी, खासगी वाहने आणि दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीवर मोठा खर्च झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पहिल्याच पावसात रस्त्याची अवस्था समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या मार्गावरील निसरड्या भागांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती, इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या वेळी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *