रत्नागिरी : विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर-निवेंडी येथे विहिरीत पडून तीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

banner 728x90

मृत बालिकेचे नाव स्वरा स्वप्नेश जाधव (वय ३) असे असून ती ठाणे जिल्ह्यातील दहिसर परिसरातील नागाव विशाल कंपाऊंड चाळ येथे वास्तव्यास होती. स्वरा आपल्या आई श्वेता जाधव तसेच इतर मित्र-मैत्रिणींसोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी भगवतीनगर-निवेंडी येथे आली होती.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास स्वरा इतर मुलांसोबत परिसरात खेळत होती. खेळताना ती अचानक दिसेनाशी झाल्याने तिच्या आईसह नातेवाईक आणि उपस्थितांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर श्वेता जाधव यांनी जवळील विहिरीत पाहिले असता स्वरा पाण्यावर उपड्या अवस्थेत तरंगताना दिसून आली. हे दृश्य पाहताच एकच खळबळ उडाली.

त्यानंतर राहुल कैलास पाटील आणि इतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने स्वराला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिचा जीव वाचविण्यासाठी उपस्थितांनी तातडीने सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया) दिली.

यानंतर स्वराला त्वरित मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, पर्यटनस्थळे आणि ग्रामीण भागातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *