उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत असताना प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते मडगाव या लोकप्रिय मार्गावर विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली असून, यामुळे कोकण व गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शाळा-कॉलेजांच्या सुट्ट्या लागतात, तसेच पर्यटन हंगामही बहरात येतो. या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे अवघड होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०११२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन विशेष ही गाडी ३ एप्रिल व ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:२० वाजता मुंबईतून सुटणार आहे. मार्गातील विविध स्थानकांवर थांबे घेत ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११३० मडगाव जंक्शन ते मुंबई CSMT विशेष गाडी ३ आणि ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजता मडगावहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल होईल.
या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना तसेच गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. विशेषतः गोवा आणि कोकण किनारपट्टीकडे जाणाऱ्यांची संख्या या काळात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













