रत्नागिरी : खेडशीत ज्वेलर्सच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला

banner 468x60

रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या खेडशी नाका परिसरातील ‘विजय ज्वेलर्स’ हे सराफी दुकान अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, विजय रामचंद्र सागवेकर यांचे खेडशी नाका येथे विजय ज्वेलर्स नावाचे दुकान असून २१ मार्च रोजी पहाटे २.३० ते ३.०० च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकानाचे बाहेरील शटर वाकवून आणि आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील १५० ग्रॅम वजनाची चांदीची जुनी मोड, ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे सहा ब्रेसलेट, १०० ग्रॅम वजनाच्या १२ चांदीच्या साखळ्या आणि रोख ७ हजार रुपये असा एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, फिर्यादी विजय सागवेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *