खेड : जगबुडी नदीपात्राला पुन्हा कचऱ्याचा विळखा

banner 468x60

खेड शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही वर्षांपूर्वी नदीपात्रात मगरी मृतावस्थेत आढळून खळबळ उडाली होती. मात्र आता नदी पात्रात मगरींची संख्या घटल्याचे चित्र दिसत आहे.

banner 728x90 banner 728x90

वेळीच उपाययोजना न केल्याने परिस्थितीत फारसा बदल झाला नाही आणि त्यामुळे क्रोकोडायल पार्क बनवण्याचे स्वप्न धूसर होताना दिसत आहे. १५ मार्च रोजी पुन्हा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, कॅरी बॅग व इतर कचरा तरंगताना दिसून आला. सध्या नदीपात्रात एका बाजूला गाळ उपसा करण्याचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा तरंगताना दिसत असल्याने नदी स्वच्छतेबाबतच्या प्रयत्नांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

शहरालगतच्या भागासह नदीकिनारी वसलेल्या भोस्ते, वेरळ व भरणे गावांमधून देखील नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नदीपात्रात वाढत्या कचऱ्यामुळे नदीचे स्वरूप गटारासारखे होत चालल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांत नदीपात्रात मृतावस्थेत मगरी आढळल्यानंतरही संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नदीपात्रात कुजणारा कचरा व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून जगबुडी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शहर व परिसरातील गावांतून नदीपात्रात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका प्रशासन व संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने लक्ष देऊन नदीपात्रात कचरा टाकण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *