चिपळूण : लोटे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाविरोधात जनक्षोभ, कर्करोगाच्या विळख्यातून वाचवा’ म्हणत चौथ्या दिवशीही बेमुदत उपोषण सुरू

banner 468x60

कोकणातील निसर्गसंपन्न पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या विषारी रासायनिक कंपन्यांविरोधात लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. परदेशात, विशेषतः इटलीसारख्या देशातून नाकारण्यात आलेले प्रदूषकारी प्रकल्प कोकणात आणल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, याविरोधात पुकारलेले बेमुदत आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच राहिले आहे.

banner 728x90


शेतकरी, बागायतदार, कामगार व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. जोपर्यंत ठोस व कठोर निर्णय घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.


आंदोलनादरम्यान ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी एमआयडीसीतील भयावह वास्तव मांडले. गेल्या साडेतीन दशकांपासून सुरू असलेल्या रासायनिक कंपन्यांकडून हवेत विषारी वायू सोडले जात असून, सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने भूजल साठेही प्रदूषित झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

विशेषतः रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या उग्र वायूमुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण होत असून, परिसरात कर्करोगासह विविध गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हा विकास नसून स्थानिक जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त करत, लोकांच्या जीवावर बेतणारा कोणताही रोजगार स्वीकारला जाणार नाही, असा ठाम इशारा आंब्रे यांनी दिला.


शेतकरी कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


घातक रासायनिक कंपन्यांवर तात्काळ बंदी घालावी, प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच लोटे परिसरातील नागरिकांची तातडीने मोफत आरोग्य तपासणी करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या आंदोलनावर शासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *