चिपळूण : शिरगाव जि.प. व पं.स. गणात युतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू, घराणेशाही मोडीत काढणार – ॲड. नयना पवार

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसेना–भाजप–रिपाइं युतीच्या उमेदवारांनी डोअर-टू-डोअर प्रचाराला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार दीक्षा दत्ता कांबळी आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. नयना पवार यांनी शिरगाव गावातून प्रचाराचा श्रीगणेशा केला.

banner 728x90

प्रचारादरम्यान उमेदवार केवळ निवडणूक चिन्ह नव्हे, तर आपले ठोस व्हिजन मतदारांसमोर मांडताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वेगळ्या धाटणीचा प्रचार अनुभवायला मिळत असून मतदारांमध्येही सकारात्मक चर्चा सुरू आहे.

शिरगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात यंदा तिरंगी लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर युतीच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.

यावेळी बोलताना पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. नयना पवार म्हणाल्या,
“शिरगाव पंचायत समिती गणातील घराणेशाही मोडीत काढण्याचा निर्धार जनतेने केला असून त्यासाठीच नागरिकांनी मला उमेदवारी दिली आहे. रस्ते, पाणी योजना यासारखी विकासकामे सुरूच राहतील; मात्र तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग कसे उभे करता येतील, यावर माझा विशेष भर राहील.”

दरम्यान, जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. दीक्षा कांबळी या मूळच्या शिरगाव येथील असून, गटाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. “गटातील मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून मतदारांनी मला संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले.


बहिणीच्या प्रचारासाठी स्वप्ना यादव मैदानात

पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. नयना पवार या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या कन्या असून त्यांचे सासर पोफळी येथील पवारवाडी येथे आहे. त्यांच्या प्रचारासाठी त्यांची सख्खी बहीण, भाजप नेते प्रशांत यादव यांच्या पत्नी. स्वप्ना यादव स्वतः मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

राजकारणातील अनुभव आणि रणनीतीची जाण असल्याने स्वप्ना यादव यांच्या सक्रिय सहभागामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिरगाव पंचायत समिती गणात नेमका कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *