चिपळूण : खड्डा चुकवताना कारचा अपघात लालपरी थोडक्यात बचावली, कुंभार्ली घाटात अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे

banner 468x60

कुंभार्ली घाटातील रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, आज 22 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एक खासगी कार थेट मोठ्या खड्ड्यात जाऊन अडकली.

banner 728x90

सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी हा अपघात गंभीर परिणाम घडवू शकला असता. दुसऱ्या घटनेत, अवघ्या दोन फूट खोल खड्डा चुकवताना एसटीची लालपरी थोडक्यात बचावली.

कुंभार्ली घाट हा कोकण–पश्चिम महाराष्ट्र जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. मात्र सध्या या घाटातील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांसाठी हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.

आज घडलेल्या घटनेत कारचालकाने समोर दिसणारा मोठा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला असता वाहन थेट दुसऱ्या खोल खड्ड्यात घसरून अडकले. यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

विशेष म्हणजे, या घाटातील खड्डे बुजवण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. मात्र कोणतेही ठोस कारण न देता हे काम अचानक बंद करण्यात आले. काम का थांबवले, निधी कुठे अडला, जबाबदार कोण – याबाबत कुठल्याही पक्षाच्या एकाही लोकप्रतिनिधीने साधी विचारणा देखील केलेली नाही, ही बाब संतापजनक आहे.

स्थानिक नागरिक व वाहनचालकांचा रोष वाढत असून, “निवडणुकीच्या काळात लोकांच्या जीवाशी खेळ होतो, पण निवडणुका आल्या की लोक पाचशे–पाचशे रुपयांची पाकीटे घेऊन गप्प बसतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दररोज शेकडो खासगी वाहने, मालवाहू ट्रक व एसटी बस या घाटातून प्रवास करतात. पावसाळा जवळ येत असताना रस्त्याची ही अवस्था कायम राहिल्यास मोठा अपघात अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवण्याचे काम पुन्हा सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

“अपघात झाल्यावर नव्हे, अपघात टाळण्यासाठी कारवाई करा,” अशी रास्त मागणी आता कुंभार्ली घाटातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *