लग्नानंतर अवघ्या आठच दिवसांनी मिरकरवाड्यातील एका नवविवाहित दांपत्याला आणि त्यांच्या मित्राला शुक्रवारी सायंकाळी भाट्ये सुरुबनात समुद्रकिनारी भीषण हल्ल्याला सामोरे जावे लागले. फिरायला गेलेल्या या तिघांवर अचानक आलेल्या गुंडांच्या टोळक्याने पैशांची मागणी करत हल्ला चढवला.
पैसे देण्यास नकार दिल्याने गुंडांनी शस्त्रे काढून दोघांनाही बेदम मारहाण केली. या हाणामारीत नवविवाहित अल्तमस अहमद मस्तान (वय २७) आणि त्याचा मित्र फाहिस समीर होडेकर (वय २५) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मिरकरवाडा आणि भाट्ये परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
पोलिस चौकी आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील रहिवासी अल्तमस अहमद मस्तान यांचा ८ दिवसांपूर्वीच आयेशा (वय २५) यांच्याशी विवाह झाला होता. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अल्तमस, आयेशा आणि त्यांचा मित्र फाहिस समीर होडेकर हे तिघे भाट्ये सुरुबनात फिरायला गेले होते.
गप्पागोष्टी सुरू असतानाच अचानक त्यांच्यासमोर एक थार गाडी येऊन थांबली. त्यातून ४ ते ५ तरुण खाली उतरले आणि त्यांनी दादागिरीच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी या नवविवाहित दांपत्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वादावादी सुरू झाली आणि झटापटही झाली. याचवेळी त्या टोळक्यातील तरुणांनी त्यांच्याकडील शस्त्रे बाहेर काढून अल्तमसवर वार केले.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अल्तमस रक्तबंबाळ झाला, तर फाहिसला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकाराने आयेशा खूप घाबरून गेली आणि तिने मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना हाक मारली. आयेशाच्या हाकेनंतर लोक धावत येताना दिसताच, हल्लेखोरांचे ते टोळके त्यांच्या गाडीतून तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले.
रक्तबंबाळ झालेल्या अल्तमस आणि बेदम मारहाणीने जखमी झालेल्या फाहिस या दोघांना स्थानिक नागरिकांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अल्तमसच्या डोक्याला मोठी जखम झाली असून, त्यावर टाके घालण्यात आले आहेत. तर फाहिस होडेकरला मुका मार लागला आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना घडल्यापासून आयेशा प्रचंड घाबरलेली आहे.
सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास भाट्ये सुरुबनात घडलेल्या या घटनेची माहिती हळूहळू मिरकरवाड्यात पोहोचताच मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. भाट्येमधील काही मंडळींनीही रुग्णालयात गर्दी केल्याने काही काळ तणावसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली. जखमींवर सध्या उपचार सुरू असून, डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येईल आणि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे मिरकरवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गाडीतून आलेले ते हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच ते तरुण कुठे पसार झाले, याचाही शोध पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













