खेड : माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी यांचे चिरंजीव सिद्धेश तोडकरी यांचे आकस्मिक निधन

banner 468x60

खेड शहरात एक अत्यंत दुःखद घटना घडली असून, माजी नगराध्यक्ष नागेशशेठ तोडकरी यांचे चिरंजीव सिद्धेश नागेश तोडकरी यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच खेड शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सिद्धेश तोडकरी हे स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे होते. मित्रपरिवारात ते ‘राजा माणूस’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी जपलेले मैत्रीचे नाते, सर्वसामान्य नागरिकांशी ठेवलेला जिव्हाळा आणि समाजातील प्रत्येक घटकाबद्दल असलेली संवेदनशीलता यामुळे ते अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते.


तोडकरी कुटुंब हे खेड शहरातील एक प्रतिष्ठित आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सिद्धेश यांच्या अकाली निधनामुळे केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण शहराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रमंडळी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला.

या दुःखद प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असून तोडकरी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी सिद्धेश यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साध्या, प्रेमळ आणि मदतीला तत्पर स्वभावाचा उल्लेख केला.

सिद्धेश तोडकरी यांच्या आकस्मिक जाण्यामुळे तोडकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कठीण प्रसंगी संपूर्ण खेड शहर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *