खेड : 16 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा, मंदिरांतील घंटा चोरणारा दुसरा सराईत जेरबंद, 10 लाखांचा ऐवज जप्त

banner 468x60

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये झालेल्या घंटा चोरीच्या मालिकेचा छडा लावत खेड पोलीस यांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून, सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हिरालाल गंगारामजी कुम्हार (रा. पनवेल, मूळ गाव राजस्थान) याला अटक केली. या कारवाईत ८ लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच २५३ किलो पितळ असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील शिरगाव खुर्द–शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातून पितळी घंटा व सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली होती. या गुन्ह्यात यापूर्वी राकेश तुळशीराम पडवकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून तब्बल १६ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला होता.


या प्रकरणाच्या सखोल तपासात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हिरालाल कुम्हार याला ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे व इतर कर्मचारी सहभागी होते.

या दुसऱ्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा जिल्ह्यांतील मंदिर चोरीची आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *