रत्नागिरी : शिरगाव येथे दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

शिरगाव ते साखरतर रस्त्यावर नंदाई गार्डनसमोर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकीसमोर अचानक बैल आडवा आल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला मित्र किरकोळ जखमी झाला. सिकंदर हुसैन बंदरकर (वय ४२, रा. साखरतर रहेबर मोहल्ला, रत्नागिरी) असे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

या घटनेबाबत सिकंदरचा मित्र सलिम हसनमियाँ मस्तान (वय ३३, रा. साखरतर रहेबर मोहल्ला, रत्नागिरी) याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.५० वाजता सलिम मस्तान आणि त्याचा मित्र सिकंदर बंदरकर हे दोघे सिकंदरच्या मालकीच्या दुचाकी (क्रमांक एमएच-०८-बीजी-४६६५) वरून गाडीतळमार्गे शिरगाव-साखरतरच्या दिशेने जात होते.

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी नंदाई गार्डनसमोर आली असता, अचानकपणे एक बैल त्यांच्या दुचाकीसमोर आला. यामुळे दुचाकीचालक सिकंदरचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकीने त्या बैलाला जोरदार धडक दिली.


या अपघातात सिकंदर बंदरकर याच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीच्या मागे बसलेला सलिम मस्तान किरकोळ जखमी झाला.


अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून सिकंदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अल्पेश विशे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *