अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे चक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीवर कायम घोंघावत आहे.
शनिवारी दिवसभर जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मुसळधार पावसाचेे सावट कायम राहिले आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार पाऊस झोडपणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोकणात विशेषत: तळकोकणात गेले 2 दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टीजवळ असलेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या 6 तासांत ताशी 5 किमी वेगाने पूर्वेकडे सरकले आहे. शनिवारी 24 मे रोजी दुपारी 11:30 वाजता ते दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ, अक्षांश 17.00 उत्तर आणि रेखांश 73.30 पूर्व, रत्नागिरीच्या जवळ केंद्रित झाले होते.
हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकेल असा अंदाज असून कोकण किनारपट्टीला त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे, या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. ताशी 60 किमी वेगाने वारे वाहतील, तसेच काही भागांत अतिवृष्टीची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह उर्वरित कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील शनिवारी सकाळपर्यंतचे पर्जन्यमान मंडणगड-01.00 मिमी, खेड-17.85मिमी, दापोली- 7.14 मिमी, चिपळूण – 46.33मिमी, गुहागर-21.40मिमी, संगमेश्वर 71.08 मिमी, रत्नागिरी -59.88 मिमी, लांजा – 82.40 मिमी, राजापूर 49.25 मिमी.
मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकणात येण्याचा अंदाज
कोकण आणि गोवा, केरळ आणि कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात 24 ते 28 मे दरम्यान बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाने झोडपून काढलेले आहे. चक्रीवादळ घोंघावत असताना मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकणपट्टी काबीज करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*