मुलांमध्ये झालेल्या किरकोळ मारामारीचा वाद वाढत जाऊन पालकांमध्येच थेट हाणामारी झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी, माशाअल्ला अपार्टमेंट येथे घडली. या घटनेत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून रत्नागिरी शहर पोलिसांनी दुसऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिफ मेमन व खुशबू मेमन (दोघे रा. हिंदू कॉलनी, माशाअल्ला अपार्टमेंट, रत्नागिरी) यांच्याविरोधात सना खालीद मजगावकर (वय ३३, रा. हिंदू कॉलनी, माशाअल्ला अपार्टमेंट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी सना मजगावकर या बुधवारी सायंकाळी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असताना त्यांच्या मुलाने फोन करून अपार्टमेंटमधीलच मेमन कुटुंबातील मुलांसोबत वाद झाल्याची माहिती दिली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर सना यांनी ‘माझ्या मुलाला का मारले?’ असा जाब खुशबू मेमन यांना विचारला. यावरून दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला.
यानंतर सना मजगावकर आपल्या फ्लॅटमध्ये गेल्या. मात्र रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास खुशबू मेमन व त्यांचे पती हनिफ मेमन यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसून शिवीगाळ व मारहाण सुरू केली. यावेळी हनिफ मेमन यांनी लोखंडी रॉडने सना यांचे पती खालीद मजगावकर यांच्या डोक्यावर वार केला. पतीला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना खुशबू मेमन यांनी सना यांच्या तोंडावर मारहाण करत नखांनी चेहऱ्यावर ओरबाडले.
झटापटीदरम्यान सना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडले असून ते सापडले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात सना व खालीद मजगावकर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जमावाला पांगवले.
या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













