रत्नागिरी : किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, “सोबत लहान मुलगी असताना असे बोलू नका” रस्त्यावरचा वाद घरी

banner 468x60

रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. फैजान रिवाज फणसोपकर (वय २३, रा. राजीवडा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

banner 728x90 banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी फैजान आणि संशयित आरोपी वसीम मुल्ला यांचा मुलगा अफान मुल्ला यांच्यात वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फैजान राजीवडा पुलाजवळून घरी जात असताना आरोपी वसीम मुल्ला याने त्याची चेष्टा केली. यावेळी फैजानने “सोबत लहान मुलगी असताना असे बोलू नका” असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला आणि फैजान घरी निघून गेला.


मात्र, त्याच रात्री ११ वाजेच्या सुमारास वाद अधिक विकोपाला गेला. फैजान घराबाहेर असताना आरोपी अरफात मोहम्मद शरीफ फणसोपकर (वय २७) याने फैजानच्या आईला उद्देशून अश्लील शिवीगाळ केली आणि फैजान कुठे आहे, अशी विचारणा केली. फैजान तिथे पोहोचला असता आरोपी इमरान अब्बास फणसोपकर (वय ३८) याने त्याला घट्ट पकडून ठेवले, तर अरफात फणसोपकर याने हातातील लोखंडी रॉडने फैजानच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले.

या झटापटीत फैजानचे टी-शर्ट फाडून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी अरफात फणसोपकर, इमरान फणसोपकर आणि वासिम मुल्ला या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *