रत्नागिरीत महायुती जाहीर, पण भाजपमध्ये अस्वस्थता — कमी जागांमुळे बंडखोरीचा सूर?

banner 468x60

रत्नागिरीतील महापालिका निवडणुकीसाठी महायुती जाहीर झाली असली तरी, भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पक्षातील इच्छुकांची मोठी संख्या आणि महायुतीच्या जागावाटपात मिळणाऱ्या कमी जागा यामुळे बंडखोरीचा सूर उमटू लागला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे उदय सामंत हे महायुतीसाठी आग्रही असताना, मंत्री नितेश राणे यांनी मात्र युतीबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर संभ्रमाचे वातावरण आहे.

भाजपकडे सध्या सुमारे ६७ इच्छुक असल्याची माहिती आहे. परंतु महायुतीनंतर पक्षाला केवळ ८ ते ९ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याने उर्वरित इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे “इच्छुकांना थोपवायचे कसे?” हा प्रश्न भाजपसमोर उभा राहिला आहे.

महायुतीबाबत बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी अलीकडेच पावस येथे पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “युती झाली असली तरी समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर वेगळा विचार करावा लागेल; आम्हाला कमी लेखू नका.” या वक्तव्यामुळे पक्षातील असंतोष अधिकच वाढल्याचे दिसते.

रत्नागिरीतील काही प्रभागांमध्ये इच्छुकांनी उघडपणे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.
प्रभाग १० मध्ये विविध पक्षांचे १३ इच्छुक असून, प्रभाग ७ मधील भाजप कार्यकर्त्यांनी अलीकडील बैठकीत शक्तीप्रदर्शन केले. तसेच प्रभाग १५ मध्येही इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे अपेक्षित प्रभाग न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला शह देण्यासाठी महायुती केली असली, तरी भाजपला अंतर्गत समन्वयाचे मोठे आव्हान भेडसावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *