रत्नागिरी : गावखडी समुद्रात तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं एका मुलाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३, सध्या रा. मेर्वी-मांडवकरवाडी, मुळ रा. तांदूळवाडी, वाळवा, सांगली) असे मृत मुलाचे नाव आहे.

आपल्या दोन मुलांसह पुतण्याला बुडताना पाहून वडिलांनी जीवाची बाजी लावत दोघांना सुखरूप बाहेर काढले; मात्र श्रेयशला वाचवण्यात त्यांना अपयश आले. मूळचे वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी (जि. सांगली) येथील रहिवासी असलेले सागर मोहन गोसावी हे मेर्वी येथे भंगार व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता. १०) शाळा सकाळची असल्याने त्यांचा मुलगा श्रेयश घरी आल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास सागर गोसावी हे श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास ही तिन्ही मुले समुद्राच्या पाण्यात खेळत असताना लाटांचा अंदाज न आल्याने ओढली जाऊ लागली.

मुले पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे लक्षात येताच सागर गोसावी यांनी तातडीने समुद्रात उडी घेतली. त्यांनी प्रथम मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर ते पुन्हा श्रेयशला वाचवण्यासाठी पाण्यात शिरले; मात्र तोपर्यंत श्रेयश लाटेसोबत खोल पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस पाटील, पूर्णगड सागरी पोलिस आणि ग्रामस्थांनी बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली; मात्र त्याचा शोध लागू शकला नाही.

अखेर शनिवारी (ता. ११) सकाळी ८ वा. श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावरील सुरूच्या बनाजवळ तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. श्रेयश हा पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर येथे सहावीत शिकत होता.

त्याच्या निधनाचे वृत्त समजताच शाळेत श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवली. श्रेयशचे पार्थिव त्याच्या मूळ गावी वाळवा-तांदूळवाडी येथे येथे नेण्यात आले असून तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *