रत्नागिरी : कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण, गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरात एका कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीला लाकडी लाटण्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीची बहीण आणि आरोपीचा भाऊ यांनी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अंजार बशीर हकीम (वय ३०, रा. २जीनाका) हे एकाच कुटुंबातील आहेत. फिर्यादीची बहीण आणि आरोपीचा भाऊ आरफात बशीर हकीम यांनी कुटुंबाचा विरोध असतानाही पळून जाऊन विवाह केला होता. या विवाहाला आरोपी अंजार याचा पाठिंबा होता, तर फिर्यादी महिलेचा विरोध होता.

गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) दुपारी २:३० च्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. “तुम्ही माझ्या आयुष्याची वाट लावली, तशीच माझ्या बहिणीच्या आयुष्याचीही वाट लावायची आहे का?” असे फिर्यादीने आरोपीला विचारले. या प्रश्नाचा राग अनावर झाल्याने अंजारने किचनमधील लाकडी लाटणे आणून वहिनीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपीने लाटण्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर आणि डाव्या कानावर प्रहार केले. त्यानंतर उजव्या कानावर जोरात फटका मारल्याने फिर्यादीच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. इतक्यावरच न थांबता आरोपीने हाताच्या गुक्क्यांनी फिर्यादीच्या पोटात मारहाण केली. “जर पुन्हा आरफातच्या लग्नाला विरोध केलास, तर ठार मारून टाकीन,” अशी धमकी देत त्याने शिवीगाळ केली.

या घटनेनंतर फिर्यादी महिलेने शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अंजार बशीर हकीम याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *