चिपळूण : आरोपीला VIP ट्रिटमेंट देणं पोलिसांना पडणार भारी, TWJ घोटाळ्याचा आरोपी संकेश घाग सोबत हॉटेलमध्ये जेवणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई

Screenshot

banner 468x60

टीडब्ल्यूजे’ प्रकरणातील आरोपीसंदर्भात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हजारो कोटी रुपयांच्या ‘टीडब्ल्यूजे’ घोटाळ्यातील मुख्य आरोपी संकेश घाग याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी हॉटेलमध्ये जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित चिपळूण पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक असलेला संकेश घाग याच्यावर हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अनेक महिने फरार असलेल्या घागला चिपळूण पोलिसांनी पुणे येथून अटक केली होती. मात्र, २७ जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणाबाबत संबंधित पोलिसांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल, असे बगाटे यांनी स्पष्ट केले.

पोलीस भरतीबाबत इशारा : दलालांपासून सावध राहा

याच पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक बगाटे यांनी आगामी पोलीस भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन केले. जिल्हा पोलीस दलातील शिपाई व चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होत असून, कोणत्याही बोगस दलालांच्या किंवा आमिषांच्या जाळ्यात अडकू नये, असे त्यांनी सांगितले.

कोणीही पैशांची मागणी करत असल्यास तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नवीन वाहनांची मागणी

रत्नागिरी पोलीस दलातील अनेक वाहने कालबाह्य झाल्याने नवीन वाहनांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच नवीन गाड्या उपलब्ध झाल्यास पोलिसांच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *