नारी सक्षमीकरणाच्या दिशेने उल्लेखनीय व समाजपरिवर्तनकारी कार्य करणाऱ्या झरीन रुमानी (संस्थापक – अपना सहयोग फाउंडेशन) यांना दापोली नारी महोत्सव २०२६ अंतर्गत नारी शक्ती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दापोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी झरीन रुमानी या Guest of Honour (प्रमुख अतिथी) म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झरीन रुमानी यांनी शिक्षण, रोजगारनिर्मिती, महिलांची जनजागृती, वैद्यकीय सेवा, तसेच कौशल्य विकास या क्षेत्रांत सातत्याने आणि प्रभावी कार्य केले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी अनेक कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येण्याचे आवाहन केले.
“महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून शिक्षण, कौशल्य आणि संघटनेच्या बळावर प्रगती साधावी,” असे त्या म्हणाल्या. समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. दापोली नारी महोत्सव 2026 अंतर्गत देण्यात येणारा नारी शक्ती पुरस्कार हा महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा मानाचा पुरस्कार असून, झरीन रुमानी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवला असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















