कोकण : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एक ठार, पत्नी-मुलीसह तिघे जखमी

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) हुंबरट येथे काल (गुरुवार) उड्डाणपुलावरील दुभाजकाला मुंबई ते गोवा भरधाव वेगाने जाणारी मोटार आदळली.

यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला. प्रवीण सुंदर शेट्टी (वय ४०, रा. घाटकोपर, मुंबई) असे त्याचे नाव आहे. अपघातात अन्य तिघे जखमी झाले. आज सकाळी दहाच्या सुमारास अपघात झाला.

मुंबई-घाटकोपर येथून शेट्टी कुटुंबीय कोल्‍हापूर आणि तेथून गोवा असे पर्यटनासाठी मोटार (एम.एच. ०३ डी.जी. ७८९०) तून निघाले होते. हुंबरट येथील उड्डाणपुलावर आल्‍यानंतर मोटार दुभाजकावर आदळली.

अपघातात चालक शेट्टी जागीच ठार झाले. शेजारी बसलेली पत्‍नी काव्यश्री प्रवीण शेट्टी (३५), मुलगी आर्वी (९) आणि मागील सीटवर बसलेले सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०, सर्व रा. घाटकोपर, मुंबई) यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दरवाजाच्या काचा तोडून जखमींना बाहेर काढले आणि कणकवली रुग्‍णालयात पाठविले.

कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. काव्यश्री शेट्टी यांना गंभीर दुखापत झाली. त्‍यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले.

त्यांची मुलगी आर्वी हिच्या हाताला दुखापत झाली. सिद्धेश सटाले यांनी वर्दी दिली. सटाले यांनी कोल्‍हापूर ते गगनबावडापर्यत मोटार चालविली होती. त्यानंतर शेट्टी चालवत होते. हुंबरट येथे आल्‍यानंतर त्‍यांना डुलकी लागल्याने अपघात झाल्‍याची माहिती सटाले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *