गुहागर येथील बाग समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची १४० अंडी सापडली आहेत. वनपाल संतोष परशेट्ये यांच्या उपस्थितीत ही सर्व अंडी उबवण कक्षात संवर्धित करण्यात आली आहेत.
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही गुहागरच्या समुद्रावर अंडी आढळण्याचा हंगाम महिनाभर लांबला आहे. गेल्यावर्षी गुहागरच्या केंद्रात २०० हून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांची २३ हजारपेक्षा जास्त अंडी संवर्धित केली होती.
यावर्षी देखील मोठ्या संख्येने ऑलिव्ह रिडले कासवांची हजारो अंडी संवर्धित करता यावीत, अशी तयारी वन विभाग आणि कांदळवन कक्षातर्फे केली जात आहे. गेल्या १० वर्षात सातत्याने गुहागर समुद्रावर अंडी देण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे येथील कासव संवर्धन निसर्ग पर्यटनाचाही एक भाग बनत आहे. यावर्षी दिवाळीनंतर वन विभाग आणि कांदळवन कक्षाने गुहागरमधील कासव संवर्धन केंद्राला अधिक बळकटी देण्याचे काम सुरू केले. मोठ्या संख्येने अंडी संवर्धित करण्यासाठी योग्य जागेची निवड करून तेथे अंडी उबवण केंद्र बांधण्यात आले आता वन विभाग, कांदळवन कक्ष, कासवमित्र आणि गुहागरमधील निसर्गस्नेही यांना ऑलिव्ह रिडले कासवांची प्रतीक्षा आहे.
दरवर्षी ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मादी अंडी घालण्यासाठी येतात. मात्र बदललेल्या हवामानामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पहिले घरटे सापडले. यावर्षी देखील बदललेल्या हवामानामुळे हंगाम लांबत चालला आहे.
१६ डिसेंबरला पहिले घरटे सापडल्यावर पुढे दररोज घरटी सापडतील, असा अंदाज होता. मात्र गेल्या तीन दिवसांत एकही घरटे सापडले नाही. उलट २० डिसेंबरला सकाळी पावसाचा हलका शिडकावा झाल्याने दुसरे घरटे मिळण्यास आणखी विलंब होऊ शकतो.
सहा कासवमित्रांची नियुक्ती
कोरोनापूर्वी ७.५ किलोमिटरच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी केवळ २ कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली होती. यावर्षी ६ कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संजय भोसले, शार्दुल तोडणकर, रवींद्र बागकर, कुसुमाकर बागकर, विक्रांत सांगळे, दिलीप सांगळे या कासवमित्रांचा समावेश आहे. त्यांना अंडी संवर्धन प्रक्रिया व पर्यटकांशी संवाद साधताना घ्यायची काळजी याबाबतचे प्रशिक्षण दिले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















