बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरट्यांनी तीन प्रवाशी महिलांच्या पर्समधील ऐवजावर डल्ला मारला. यात रोख रक्कम आणि मोबाईल अशा मौल्यवान वस्तू लांबवण्यात आल्या होत्या.
धक्कादायक म्हणजे हे सर्व करणारी एक अल्पवयीन युवती असल्याचे पोलीस तपासात समोर आले. या युवती सोबत तिचे साथीदारही होते. ही सर्व घटना बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती
गर्दीचा फायदा घेत चोरी ११ जानेवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील बस स्थानकात खेड ते बिजघर अशी जाणारी एसटी बस प्लॅटफॉर्म वर लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली.
याच गर्दीमध्ये एका महिलेच्या पर्स मधील ७ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल अशा वस्तूंची चोरी झाली तर दुसऱ्या महिला प्रवाशाच्या मोबाईची चोरी झाली.
पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली.
अखेरीस बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक युवती संशयास्पदरित्या गर्दीत इकडून तिकडे फिरताना आढळली. या दोन्ही प्रवाशी महिलांच्या पाठीमागे ती संशयास्पद युवती काळी ओढणी हातावर घेत फिरत होती. तसेच बसमध्ये चढणाऱ्यांची गर्दी कमी होऊ लागल्यानंतर तिने तिकडून पळ काढला.
हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर खेड पोलीस निरीक्षक नितिन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. साधारण सर्व झोपडपट्ट्यांमधून पहिल्यांदा पाहणी केली. अखेरीस खेड रेल्वे स्थानकात ही संशयास्पद मुलगी आढळली.
पोलिसांनी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिच्याकडे चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमाल आढळून आला. थोडा वेळ झाला असता तर ती युवती आणि तिच्यासोबत असणारे तिचे साथीदार रेल्वेने पसार झाले असते.
मात्र, खेड पोलिसांनी कमालीची चक्रे फिरवून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवला. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या दीड तासात या चोरीचा छडा लावणाऱ्या खेड पोलिसांचे कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















