खेड : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्ग वरील तुळशी फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत वाहनाचे चाक थेट तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.


अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. सुरुवातीला मृत तरुणीची ओळख पटली नव्हती. काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेली तरुणी रस्त्यावर पडलेली आढळून आली. स्थानिकांच्या मदतीने व नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर मृत तरुणीची ओळख कु. स्वप्नाली विजय कदम अशी पटली. त्या श्री. विजय लक्ष्मण कदम यांची कन्या असून मूळ राहणार वावे (वाळंजवाडी) तर्फे नातू गाव येथील आहेत. त्यांचे कुटुंब सध्या ठाणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.


या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहाटेच्या सुमारास संबंधित तरुणी महामार्गावर कशासाठी होती, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र कोणत्याही शक्यतेबाबत अधिकृत माहिती नसून, पोलिस तपासानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संबंधित वाहनचालकाचा माग काढण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *