गुहागर : उमराठ खुर्दचे मृदुंग व पखवाज वादक सोनू महादेव गावणंग यांचे दुखःद निधन

banner 468x60

गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुपुत्र जेष्ठ नागरिक सोनू महादेव गावणंग यांचे बुधवार दि. १३.८.२०२५ रोजी सकाळी ७ च्या दरम्याने ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबई, कुर्ला येथील राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

banner 728x90

त्यांना भाग्यवान म्हणावे लागेल. त्यांचे पुर्ण आयुष्य मुळगावी उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे गेले. परंतु मृत्यू समयी एक दिवस अगोदर मुंबईत राहणारे मुलगा, सुनबाई, नातवंडे आणि भाऊबंद यांना जणूकाही भेटायला आले आणि सर्वांना भेटून भरल्या घरात सर्वांचा अखेरचा निरोप घेतला.

खुर्द उमराठ आंबेकरवाडीच्या तसेच उमराठ गावाच्या विकास / धार्मिक कामांत आणि गावाच्या जडणघडणीत इतर आधारस्तभां बरोबरचे ते एक आधारस्तंभ तसेच सक्रिय सहभाग घेणारे उत्तम मार्गदर्शक होते.

गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोलाचे योगदान असायचे. *कै. सोनू महादेव गावणंग* हे तसे स्वभावाने शांत, मनमिळावू, परोपकारी, सर्व लहान-थोर मंडळींशी अगदी मिळून-मिसळून मनमोकळेपणाने वागणारे होते.

लहानपणापासून त्यांना शेतीची आणि इतर कष्टाची कामे करण्याची सवय असल्यामुळे त्यांची शरीरयष्टी सुद्धा मध्यम, काटक, सडपातळ आणि निरोगी होती.

ते एक साधी राहणी आणि उच्च विचार सरणीचे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक न्यायदानात त्यांचा हातखंड होता. कोणत्याही कार्यक्रमात मग तो सामाजिक किंवा धार्मिक असो, त्या बाबतीत योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्था पाहणारे ते एक कुशल व्यवस्थापक होते.

त्यांना पुर्वापार चालत आलेल्या जुन्या रूढी- परंपरा यांची चांगलीच जाण होती. ते तरूण मंडळींना वेळोवेळी रूढी-परंपरां अवगत करत असत. जुन्या रूढी-परंपरा सांभाळून त्यात काळानुसार व परिस्थितीनुसार फेरबदल व्हायला पाहिजे, या मताशी ते सहमत असत आणि त्यातूनच नवीन पिढीला योग्य ते मार्गदर्शन करीत असत.

शिक्षण कमी असले तरी ते एखाद्या आर्किटेक्चर किंवा इंजिनियर पेक्षा सुद्धा भारी होते. त्यांना उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील एक *जाणता राजा* अशी उपाधी दिल्यास वावगं ठरणार नाही. *कै. सोनू महादेव गावणंग* यांच्या अंगी अनेक नाविन्यपूर्ण गुण अवगत होते.

ते एक आंबेकरवाडी नमन या लोककलेतील मंडळात उत्तम मृदुंग वादक तसेच भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांत पखवाज वाजवणारे सराईत कलाकार होते.

शुभ लग्नकार्यात किंवा धार्मिक कार्यक्रमांतील जुन्या आठवणीतील ताशा वादनात आणि सनईला सूर देण्यात तसेच लहानपणा पासून ते तरूणावस्थे पर्यंत गाई-गुरांना रानमाळावर घेऊन जाता/येताना पावरी (बासरी) वाजवण्यात सुद्धा ते पारंगत होते.

पंचक्रोशीत त्यांचा उत्तम ताशा वादक म्हणून नावलौकिक होता. गावात लग्नकार्ये असोत किंवा सार्वजनिक धार्मिक कार्ये असोत जेवण बनवणाऱ्या आचारींच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी असायचे.

उमराठ गावाची ग्राम देवता श्री नवलाई देवी मंदिरात देवदिवाळी निमित्त होणाऱ्या बगाडा उत्सवात मानाच्या मानकऱ्यांना आकडे टोचून लहाटेला गाठ बांधून फिरवले जाण्याची प्रथा आहे.

यावेळी पोलादी आकड्यांना गाठ बांधण्याचे मोठ्या जबाबदारीचे काम ते गेली अनेक वर्षे करत असत. यामध्ये सुद्धा त्यांचा हातखंड होता. शिवाय त्यांच्या अंगी भुतदया हा उत्तम गुण होता. ते मुक्या पाळीव प्राण्यावर अतोनात प्रेम करणारे होते.

शेवट पर्यंत त्यांनी गाई-गुरांचे उत्तम संगोपन व पाळण-पोषण केले. मुक्या प्राण्यांच्या आजारपणाचे निदान करून नैसर्गिक औषधोपचार काय व कसे करायचे याचे उत्तम ज्ञान त्यांच्याकडे होते. असे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारी व्यक्ती नियतीच्या कालचक्रानुसार निघून गेल्याचे दुःख निश्चितच सर्वांना आहे.

परंतु विधीलिखीता पुढे काही कुणाचे चालत नाही असे म्हणतात ते काही खोटं नाही. उमराठ गावात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार मुळगावी करण्यात आले. यावेळी संपूर्ण उमराठ गावातील मानमानकरी आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कै. सोनू महादेव गावणंग* यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा संदिप, सुनबाई, दोन मुली, नातवंडे आणि भाऊबंद असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने नाही म्हटले तरी एक वाडीतील जेष्ठ सदस्य गेल्याने आंबेकरवाडीवर दुखाःचे सावट पसरलेले आहेच. संपूर्ण आंबेकरवाडीच्या आणि त्यांच्या गावणंग परिवारावर ओढवलेल्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोतच.

त्या दुखाःतून बाहेर येण्यासाठी/ सावरण्यासाठी त्यांच्या कुटूंबिंयाना धैर्य, ताकद आणि शक्ती मिळो तसेच *दिवंगत कै. सोनू महादेव गावणंग यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो* हिच आपणां सर्वांतर्फे, उमराठ खुर्द आंबेकरवाडी प्रतिष्ठान तर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. – जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रामपंचायत उमराठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *