बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीतून आता चक्रीवादळ तयार झालं असून, त्याला ‘मोंथा’ या नावानं ओळखलं जाईल. पुढच्या 24 तासांत मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, 27 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
28 ऑक्टोबरला भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम-आणि कलिंगपट्टणमदरम्यान हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे, पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात विदर्भाच्या काही भागांतही जाणवू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पट्ट्यात याचा प्रभाव प्रामुख्याने जाणवेल.
किनाऱ्यावर धडकल्यानतंर हे चक्रीवादळ विदर्भालगत छत्तीसगडच्या दिशेनं वर सरकू शकतं. विशेषतः विदर्भाच्या पूर्वेकडील भागांत यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात 28 ऑक्टोबरसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुढच्या 2 दिवसांत कोकण आणि घाट प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ गुजरातकडे सरकू शकतं. 27 ऑक्टोबरला कोकणातील सर्व जिल्ह्यांत तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील भागात यलो अलर्ट आहे.
तसंच पश्चिम किनाऱ्यावर मासेमारीसाठी जाणाऱ्यांना आणि जहाजांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
27 ऑक्टोबरला कोकणातील सर्व जिल्ह्यांत तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील भागात यलो अलर्ट दिला आहे.
मोंथा चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना ताशी 90-100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि काही वेळा वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. एखाद्या चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 88-117 किमीपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं.
मोंथा चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग पाहता, पुढचे 5 दिवस बंगालच्या उपसागरात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सूननं माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यांत चक्रीवादळं तयार होतात.
मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि यंदाच्या वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता आणि त्यातूनच शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















