रत्नागिरी : बावनदीत बुडून हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील बावनदी परिसरात पोहण्यासाठी उतरलेल्या हातखंबा येथील ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली.


सचिन सुरेश सनगरे (रा. हातखंबा सनगरेवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे हातखंबा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सचिन सनगरे व मिलिंद पांडुरंग सनगरे हे ‘गावात जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, ते थेट बावनदीच्या काठावर पोहोचले. प्रखर उन्हामुळे थंडावा मिळावा म्हणून नदीत उतरायचे ठरवले. धरणाच्या खालच्या बाजूला, पुलाच्या वरच्या भागात असलेल्या खोल डोहात सचिन पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागले.

ही स्थिती लक्षात येताच मिलिंद सनगरे यांनी मदतीसाठी जोरात आरडाओरडा केला. आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने सचिन यांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पंचनामा करण्यात आला असून, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *