दापोलीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार–दुचाकीचा भीषण अपघात; 1 जखमी

banner 468x60

दापोली शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघाताची घटना घडली. दापोली–हर्णे मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन तिघे जण जखमी झाले. मंगळवारी (१ जानेवारी) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

चारचाकी वाहन क्रमांक MH 12 LP 2112 (सियाझ) चालवणारे प्रज्वल गणेश देवधर (वय २४, रा. जालगाव, ता. दापोली) आणि त्यांच्या बाजूला बसलेले विराज वणे गाडीमध्ये होते. तसेच दुचाकी क्रमांक MH 12 LQ 6847 चालवणारे सुदर्शन माणिक बहिरे हे जखमी झाले आहेत.

दरम्यान विराज वणेने कोकण कट्टा न्यूज जवळ संपर्क साधला असून आम्ही जखमी झालो नाही, आम्ही पूर्णपणे सुरक्षित आहोत असं म्हटलं आहे.

फिर्यादी प्रज्वल देवधर यांच्या तक्रारीनुसार, आरोपी दुचाकी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवले, रॉंग साईडने येत चारचाकी वाहनाला समोरून धडक दिली. या अपघातात स्वतःला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अपघातस्थळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी वाहने उभी राहत असल्याने रस्ता अरुंद झाल्याचे दिसून येते. एका बाजूला स्कूल बस तर दुसऱ्या बाजूला फूड व्हॅन उभी राहत असल्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सदर ठिकाण अत्यंत धोकादायक बनले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अडथळा ठरणारी वाहने हटवावीत, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी दुचाकी चालक सुदर्शन माणिक बहिरे याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. ०१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *