दापोली : नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू, गावात हळहळ

banner 468x60

दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचा विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. लक्ष्मी सहदेव भानत असे मृत वृद्धेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण सोवेली परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी भानत या गेल्या अनेक दिवसांपासून सांधेदुखीच्या तीव्र त्रासाने त्रस्त होत्या. वाढते वय आणि सततच्या वेदनांमुळे त्या मानसिकदृष्ट्याही खचल्या होत्या. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्या अधिकच नैराश्यात दिसत होत्या आणि वारंवार डोके धरून शांत बसत होत्या.

गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्या कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडल्या. बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. घराजवळील परिसर, शेजारीपाजारी आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर कुटुंबीय विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळ पोहोचले. तेथे विहिरीत पाहिले असता लक्ष्मी भानत या पाण्यात उताण्या अवस्थेत तरंगताना दिसून आल्या.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या घटनेची खबर रविकांत गोविंद भानत यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना आजारपणाला कंटाळून घडली की अपघाती स्वरूपाची आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

वृद्धेच्या अचानक निधनामुळे भानत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *