दापोली : दुचाकी अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, शिक्षण क्षेत्रात शोककळा

banner 468x60

दापोली येथे दुचाकी अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.


banner 728x90 banner 728x90

मोटारसायकल अपघातात दापोली येथील महाळुंगे प्राथमिक मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिलीपकुमार तुळशीराम पेठे यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे दापोली तालुक्यासह शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दिलीपकुमार पेठे हे मोटारसायकलवरून दापोली येथे जात असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने दापोली येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना त्यांच्या मूळ जिल्हा अकोला येथे नेण्याचा निर्णय घेतला.

अकोला येथे उपचारासाठी नेत असताना दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दिलीपकुमार पेठे हे मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांप्रती अत्यंत आपुलकीने वागणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना सहकारी शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *