दापोली : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाखांची फसवणूक, दापोलीतील माजी प्राध्यापकाची आर्थिक लूट

banner 468x60

कोकणात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीचा आणखी एक गंभीर प्रकार दापोली तालुक्यात उघडकीस आला आहे. स्वतःला पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी दापोलीतील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला मानसिक दडपणाखाली ठेवत तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक अशी संशयितांची नावे असून, त्यांनी 4 नोव्हेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत सुनियोजित पद्धतीने ही आर्थिक फसवणूक केली.


संशयितांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत स्वतःला बेंगळुरू पोलीस तसेच नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. जोशी यांच्या नावाने कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथे बँक खाते असल्याचा बनाव करण्यात आला. या खात्यामधून 3 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणी 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल, अन्यथा डिजिटल अरेस्ट करण्यात येईल, अशी धमकी देत संशयितांनी जोशी यांना सतत संपर्कात ठेवले.


पोलीस व तपास यंत्रणांचे नाव वापरून संशयितांनी केलेल्या या धमक्यांमुळे डॉ. जोशी प्रचंड मानसिक तणावाखाली गेले. संशयितांच्या सांगण्यानुसार आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी, त्यांनी ॲक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग केली. या कालावधीत एकूण 1 कोटी 23 लाख रुपये संशयितांच्या सांगण्यानुसार विविध खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांनी संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटू लागल्यानंतर आणि संबंधित यंत्रणांकडून खातरजमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे डॉ. जोशी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संशयितांनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती, डिजिटल व्यवहार तसेच कॉल रेकॉर्ड्सची सखोल तपासणी करण्यात येत आहे. आर्थिक रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आली, याचा मागोवा घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.

या घटनेमुळे दापोलीसह संपूर्ण कोकण परिसरात खळबळ उडाली असून, ‘डिजिटल अरेस्ट’, ‘सीबीआय चौकशी’ किंवा ‘बँक खात्यातील गैरव्यवहार’ अशा कारणांवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे वाढते जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा फोन कॉल्सवर विश्वास न ठेवता त्वरित पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *