चिपळूणचे सुपुत्र व सुप्रसिद्ध त्वचारोग व सौंदर्यविकार तज्ज्ञ डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड झाली आहे.
IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी तसेच आपत्तीच्या काळात प्रभावी, समन्वयित व तत्पर वैद्यकीय सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही समिती करणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्राबाबत लवकरच बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत.
डॉ. यतीन जाधव हे कोकणातील सुप्रसिद्ध स्प्रिंग क्लिनिकचे संचालक असून अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आहेत. त्यांनी जिल्ह्यातील अनेक नामांकित औद्योगिक आस्थापनांमध्ये औद्योगिक स्वास्थ्य चिकित्सक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. औद्योगिक स्वास्थ्य व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान व प्रभावी कार्यशैली यासाठी ते विशेष परिचित आहेत.
यापूर्वी त्यांनी IMA महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्ष व समन्वयक ही पदे यशस्वीरित्या भूषवली आहेत. तसेच ते इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष व कोरोना टास्क फोर्सचे कोकण विभाग समन्वयक म्हणूनही कार्यरत होते.
डॉ. जाधव यांची सामाजिक व सांस्कृतिक कारकीर्दही तितकीच उल्लेखनीय आहे. कोकणच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर संस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच सांज सोबत, एकता विकास मंच, आपलं चिपळूण, टच या सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कोकण समन्वयक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. वैद्यकीय व सामाजिक विषयांवरील त्यांचे विचारप्रवर्तक लेख विविध शास्त्रीय व इतर नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत.
ते चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य – चिपळूण शाखेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे.
भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांची सर्वात मोठी व नामवंत संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने चिपळूणसारख्या छोट्या शहरातून डॉ. यतीन जाधव यांच्यासारख्या लोकाभिमुख, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चेअरमनपदी निवड करून दिलेली संधी ही समस्त चिपळूणकरांसाठी मोठ्या गौरवाची बाब असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













