चिपळूण : PSI मनीष कांबळे ACBच्या जाळ्यात; 15 हजारांची लाच घेताना एजंट रंगेहाथ, कांबळे आणि अभिजीत शिर्केवर गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्या कारवाईत अडकले असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी त्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम १५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याची माहिती ACBच्या सूत्रांनी दिली.

तक्रारदाराने ACBकडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण येथे सापळा रचण्यात आला. PSI कांबळे यांनी थेट लाचेची रक्कम स्वीकारण्याऐवजी अभिजीत शिर्के या खाजगी व्यक्तीमार्फत पानटपरीवर पैसे घेण्याची व्यवस्था केल्याचे तपासात उघड झाले आहे.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १५ हजार रुपये दिल्यानंतर ACBच्या पथकाने अभिजीत शिर्के याला रंगेहाथ पकडले. चौकशीत ही रक्कम PSI मनीष कांबळे यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे ACBच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी PSI मनीष कांबळे आणि अभिजीत शिर्के यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *