मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील फरशीनाका परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून कारसह एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गोपिनाथ राणे हे आपल्या कारने मुंबई–गोवा महामार्गावरून प्रवास करत होते. फरशीनाका येथील पुलाजवळ ते पुढील वाहनाला बाजू काढण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी त्यांनी अचानक वेग वाढवत कार वळवली. मात्र, समोरून येणाऱ्या बोरिवली–कणकवली मार्गावरील एसटी बसचे अंतर अचूक न आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट बसवर जाऊन आदळली.
या बसचे चालक शिवराम सुधाकर राणे (रा. कणकवली) हे होते. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातात बसच्या समोरील भागाचे, विशेषतः हेडलाईट आणि बंपरचे मोठे नुकसान झाले, तर कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी कार चालक गणेश राणे यांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे.
महामार्गावर काही काळ वाहतूक मंदावली होती. पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील भरधाव वेग आणि बेदरकार ओव्हरटेकिंगमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















