खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज या कंपनीविरोधात कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने लवकरच परिषद घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दलवाई म्हणाले की, सदर कंपनी सरकार आणि काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून येथे घातक रसायनांचे उत्पादन घेतले जात आहे, याची पूर्ण माहिती शासनाला आहे. काही दिवसांपूर्वी लोटे येथे भेट दिलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनी कोकणसाठी घातक ठरत असल्यास ती बंद केली जाईल, असे स्पष्ट विधान केले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची टीका त्यांनी केली.
“जर सरकारला कंपनी घातक आहे की नाही हे तपासायचे असेल, तर आमच्याशी चर्चा का केली जात नाही?” असा सवाल उपस्थित करत, सरकारच्या भूमिकेची वाट न पाहता आता ग्रामस्थांना सोबत घेऊन एकत्रित लढा उभारण्यात येणार असल्याचा निर्धार दलवाई यांनी व्यक्त केला.
सध्या गावोगावी बैठका घेऊन बाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात असून आयनी, असगणी, दाभिळ, मेटे, कोतवली, घाणेकुंट, सात्विनगाव, लवेल, सोनगाव आणि मालदोली या गावांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. या सर्व गावांतील ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या लढ्याला एकमुखी पाठिंबा दर्शवला असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व गावांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच परिषद घेण्यात येणार असून, त्या परिषदेत महत्त्वाचे ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात येतील. तसेच कंपनीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही दलवाई यांनी स्पष्ट केले.
या लढ्यात सर्वांनी निपक्षपातीपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामसभांमधून गंभीर आरोग्य समस्यांची माहिती समोर येत असून काही नागरिकांना कर्करोग, पक्षाघातासारखे आजार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चार दिवसांपूर्वी सोनगाव येथे चार जनावरे दगावल्याची घटनाही घडल्याचे दलवाई यांनी नमूद केले. मात्र या सर्व बाबींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हा लढा कोकण वाचवण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी आहे. संघर्ष समितीतील कोणताही कार्यकर्ता कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केली तरी आम्ही पुढे राहू; पहिली काठी आम्ही खाऊ, जेलमध्येही आम्ही जाऊ. मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे ठाम प्रतिपादन दलवाई यांनी केले.
या वेळी कोकण पर्यावरण संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्धे, पर्यावरण अभ्यासक पंकज दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदूलकर, तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















