चिपळूण : परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे, दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले

banner 468x60

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटीकरणाला जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणच्या भेगाही रूंदावल्या आहेत.

याशिवाय घाटातील प्रत्येक टप्प्यावर दरडी कोसळल्या आहेत. एकेरी मार्गावर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आली असून, ती अद्याप हटवलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू असून, वाहतूकदारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

परशुराम घाटात नव्याने केलेल्या काँक्रीटला २ जुलै रोजी तडे गेले होते. यावरून निकृष्ट कामाचा नमुना समोर आला होता. त्यावेळी तडे गेलेल्या भागात सिमेंट भरून त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात तडे गेलेल्या भेगा पुन्हा रूंदावल्या आहेत. तेथील काही भाग खचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घाटात एकेरी मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम पाऊस सुरू होण्याआधी पूर्ण केले.

मात्र, दुसऱ्या मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्याने त्यात यंत्रणा गुंतली.

मात्र, आठवडाभरात झालेल्या पावसात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे. एकेरी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर दरडी खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यातील भरावही हटविलेला नाही. त्यामुळे आणखी दरड कोसळल्यास दुसऱ्या मार्गावर दगड गोठे व माती येण्याची दाट शक्यता आहे.

परशुराम घाटातील दुसऱ्या मार्गावरही जागोजागी तडे गेले असून, काही ठिकाणी काँक्रीटीकरण खचले आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणचे तडे व भेगाही रूंदावत चालल्या आहेत.

कातळ पुन्हा फोडण्यास सुरुवात

परशुराम घाटातील चौपदरीकरणात सुरुवातीपासून अडथळा ठरलेला मध्यवर्ती ठिकाणचा कातळ फोडण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. याआधी दोन ब्रेकरच्या साहाय्याने कातळ फोडला जात होता. परंतु, पावसामुळे धोका असल्याने एका ब्रेकरच्या साहाय्याने हळूहळू कातळ फोडला जात आहे.

परशुराम घाटातील चौपदरीकरणामुळे घाटमाथ्यावरील वस्तीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने परशुराम दुर्गवाडी येथील २२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याच्या नोटीस देण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. अखेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामस्थांना नोटीस बजावल्या आहेत. त्याला ग्रामस्थ कितपत प्रतिसाद देतात, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *