हर्णे : बंदरासमोर बंदी असूनही अवैध मासेमारी, स्थानिक मच्छीमारांत तीव्र संताप

banner 468x60

शासनाने १ जून ते ३० जुलैदरम्यान मासेमारीस बंदी घातली असताना देखील रायगड आणि मुंबई येथून आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी हर्णे बंदरासमोर बिनधास्त मासेमारी सुरू केल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “नियम फक्त आम्हालाच का?” असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक मच्छीमारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

banner 728x90


मासेमारी बंदीचा कालावधी मासळीच्या प्रजननाचा काल आणि मान्सूनामुळे असलेल्या अस्थिर हवामानाचा विचार करून निश्चित करण्यात आला आहे. या काळात समुद्राला उधाण असते आणि मासळी किनारपट्टीकडे येते, त्यामुळे मासेमारीला बंदी असते. मात्र, यंदा शासनाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असून, सुमारे १५ ट्रॉलर्स हर्णे बंदरासमोर ५ ते ६ नॉटिकल मैलाच्या आत मासेमारी करताना दिसून आल्या.


यामुळे हर्णे पाजपंढरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी अलिबागजवळ पाकिस्तानची नौका आढळल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. शासनाचा ड्रोन अद्याप तैनात न झाल्यामुळे परिस्थितीची योग्य नोंद होऊ शकलेली नाही.

स्थानिक मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय खात्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.


हर्णे बंदर कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर यांनी सांगितले की, “आम्ही नियम पाळतो आणि आमच्या परिसरात बाहेरचे मासेमार बिनधास्त मासेमारी करताहेत. यंत्रणा निष्क्रिय आहे. यापुढे जर परिस्थिती अशीच राहिली, तर मच्छीमार कायदा हातात घेण्यास भाग पाडले जातील.”

स्थानिक मच्छीमार अनंत चोगले यांनी देखील शासन आणि प्रशासकीय यंत्रणांची निष्क्रियता लक्षात घेऊन संताप व्यक्त केला. “आम्हालाच नियम लागू आणि बाहेरून आलेल्यांना मोकळे रान? आम्ही कुणाकडे पाहायचे? शासन कुठे आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हर्णे परिसरातील मच्छीमार समाजातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *