दापोली : फेसबुक लाईव्ह वरून आत्महत्येचं प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे वाचवले दापोली पोलिसांनी प्राण

banner 468x60

रत्नागिरी येथील सायबर कक्षाकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाल करत एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. सायबर यंत्रणेला फेसबुक लाईव्हद्वारे एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले होते.

banner 728x90

‘प्रेमचंद नथ्थू शर्मा’ या नावाने हा व्हिडीओ प्रसारित झाल्याने, दापोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तयार करून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.


तपासाअंती, प्रेमचंद शर्मा याचा शोध दापोली तालुक्यातील काळकाईकोड परिसरात लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत, संबंधित मोबाईल क्रमांक आणि सिमकार्ड त्याने आपल्या ओळखीच्या आणि पूर्वीच्या सहकाऱ्याला, जंग बहादूर रणवीर सिंग (मूळ रा. मूडवारा, तहसील बगेरू, जि. बांदा, उत्तर प्रदेश, सध्या रा. काळकाईकोंड, दापोली) याला वापरण्यास दिले असल्याचे समजले.


यानंतर, पोलिसांनी जंग बहादूर याचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने कबूल केले की, आई-वडिलांशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे भावनिक अस्वस्थतेतून त्याने आत्महत्येचे नाटक करत हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

हा व्हिडीओ केवळ आई-वडिलांना दाखवण्यासाठी तयार केला होता, मात्र मोबाईल हाताळण्याचा अनुभव नसल्यामुळे तो चुकून फेसबुकवर अपलोड झाल्याने हा संपूर्ण प्रकार गाजला, असे त्याने सांगितले.
पोलिसांनी जंग बहादूरला पोलीस ठाण्यात आणून त्याची समजूत काढली.

त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन त्याला योग्य समुपदेशनही करण्यात आले. आता आत्महत्येचे कोणतेही विचार मनात नसल्याचे आणि भविष्यात काही अडचण आल्यास पोलिसांची मदत घेणार असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. दापोली पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे एक अनाठायी घटना टळली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *