गणपतीपुळे येथे समुद्रात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यवसायिक, जीवरक्षक, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या तत्परतेमुळे आणखी दोन तरुणांचे जीव वाचविण्यात यश आले.
मृत तरुणाचे नाव प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय २६, रा. मानखुर्द, मुंबई) असे आहे. तर भीमराज आगाळे (वय २४, रा. कल्याण, मुंबई) आणि विवेक शेलार (वय २५, रा. विद्याविहार, मुंबई) या दोघांना बचावण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श धनगर (वय २६, रा. गोवंडी), प्रफुल्ल त्रिमुखी (वय २६, रा. मानखुर्द), सिद्धेश काजवे (वय २५, रा. परेल-लालबाग), भीमराज आगाळे (वय २४, रा. कल्याण) आणि विवेक शेलार (वय २५, रा. विद्याविहार) असे पाच कॉलेजमधील मित्र गणपतीपुळे देवदर्शन आणि पर्यटनासाठी शुक्रवारी सकाळी आले होते
.
हे सर्वजण एका खाजगी लॉजमध्ये थांबले होते. दुपारनंतर त्यांनी समुद्रात स्नानासाठी जाण्याचे ठरविले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रात आंघोळ करत असताना प्रफुल्ल, भीमराज आणि विवेक हे तिघे खोल पाण्यात गेले व बुडू लागले. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला.
हा प्रकार पाहताच मोरया वॉटर स्पोर्ट्सचे जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाडसाने समुद्रात उडी घेऊन तिन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले. तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांना प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मृतदेहाचे खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी दिली.
दरम्यान, मृत तरुणाच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















