दापोली : आगग्रस्तांना व्यापारी संघटनेकडून ₹2.70 लाखांची मदत, अग्निशमन दल आणि मदतकर्त्यांचा गौरव

banner 468x60

दापोलीमध्ये दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री दापोली बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीत पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, संपूर्ण बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या दुर्घटनेनंतर दापोली शहर व्यापारी संघटनेने तातडीने पुढाकार घेत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी निधी उभारणी केली. त्यानुसार, बाधित पाच दुकानदारांपैकी तीन दुकानदारांनी आर्थिक मदत स्वीकारण्यास नम्र नकार दिला, तर उर्वरित दोन गंभीर नुकसानग्रस्त दुकानदारांना पुनर्वसनासाठी एकूण सुमारे ₹२ लाख ७० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.

ही मदत दापोली शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदिप राजपुरे, विश्वस्त दिनेश नायक, उपाध्यक्ष राकेश कोटीया, कौशिक मेहता, सचिव दिनेश जैन आणि योगेश पिंपळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या मदतीमुळे बाधित व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी दिलासा मिळाला असून, व्यापारी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले.

आगीच्या घटनेच्या रात्री बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले होते. आग वाढत असताना अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी तत्काळ फायर बॉल्सचा वापर करून प्राथमिक टप्प्यात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या सजगतेमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखता आली.

घटनेची माहिती मिळताच साई मोरे, विकास पालटे, गणेश सकपाळ,. सचिन झगडे,. विजय धोपट, प्रतिक उर्फ मुन्ना दळवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दापोली नगरपंचायतीकडून बुलेट फायटर बाईकसह . अमित रेमजे घटनास्थळी दाखल झाले. तसेच खेड नगरपरिषदेकडून अग्निशमन दलाने आपले टँकर घेऊन त्वरित पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग अधिक फैलावण्यापासून रोखली गेली आणि मोठी दुर्घटना टळली.

या धाडसी कार्याचा गौरव म्हणून दापोली शहर व्यापारी महासंघटनेतर्फे संबंधित सर्व अग्निशमन जवान, मदतकर्ते आणि स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार संघटनेचे खजिनदार माणिकशेठ दाभोळे, जावेदभाई मणियार आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमाला बाजारपेठेतील अनेक व्यापारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजुशेठ बुटाला, प्रमोद पांगारकर, प्रशांत शेठ, दिलीपशेठ जैन, महेश जैन, राकेश माळी, शांतीभाई जैन, परेश व चेतन जैन, ॐकार कर्वे, राजुशेठ पेठकर, केदार तटकरे, संदिप महाजन, गणेश घाडगे, पारस गुर्जर, दिलीप दुर्गावळे, किरण विचारे, मंदार केळकर, दिलीपशेठ भैरमकर, रुपालाल व लक्ष्मण चौधरी, चंदरशेठ जगदाळे, टीव्हीएस चॅम्पियनचे साद बुरोंडकर, रसिक मोटर्सचे म्हामणकर आणि इन्फिनिटी होंडा शोरूमचे रिहानभाई यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्ष संदिप राजपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपत्तीच्या काळात व्यापाऱ्यांनी एकदिलाने उभे राहणे हीच खरी ताकद आहे. संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही दापोली बाजारपेठेची परंपरा आहे. भविष्यातही व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री, विशेषतः अग्निशमन यंत्रणा व फायर बॉल्स दुकानात ठेवाव्यात.”

या घटनेतून व्यापारी ऐक्य, सामाजिक जबाबदारी आणि आपत्कालीन सज्जतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. आगग्रस्तांना मिळालेली मदत आणि अग्निशमन दलाचा गौरव यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *