रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल

banner 468x60

केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्या समर्थनार्थ “प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू” असा इशारा दिल्याप्रकरणी परशुराम कदम यांच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90

शिवसेना (शिंदे गट)चे युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५१ (२) नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.


रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान हातखंबा गटातून शिवसेना (शिंदे गट)कडून उमेदवारी न मिळाल्याने परशुराम कदम यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या कारवाईनंतर केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी तात्काळ युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

अपक्ष निवडणूक लढविलेल्या कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीनंतर विजयी उमेदवार ॲड. कांबळे यांच्या मिरवणुकीदरम्यान परशुराम कदम यांच्या घरासमोर नारळ व फटाके फोडण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले होते.

या कारवाईनंतर कदम यांनी ती अन्यायकारक असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलीस यांनी कदम यांच्या वक्तव्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *